| मुंबई | प्रतिनिधी |
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नारायण राणे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स बजावले असून, 12 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी हे आदेश दिले असून, नारायण राणे यांच्यासह निवडणूक अधिकारी यांनाही याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या, अशी विनंती याचिकेतून केली होती. या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नारायण राणे यांना 12 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले.