ऑनलाईन गेमिंगच्या नादात सव्वा कोटींचा गंडा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील विंधणे येथील धाकटी जुई गावातील 26 वर्षीय वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने ऑनलाईन गेमिंगच्या नादात तब्बल 1 कोटी 27 लाख 31 हजार 202 रुपये गमावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाने नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ‌‘खेलो24मॅच‌’ या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या संचालक, व्यवस्थापक, ग्राहक प्रतिनिधी तसेच या प्रकाराला सहकार्य करणाऱ्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धाकटा जुई राहणा-या तरूणाकडे वाहतूक व्यवसायासोबत जमीन विक्रीतून आलेली मोठी रक्कम होती. त्यामुळे ऑक्टोबर 2024 ते जुलै 2026 या कालावधीत हा तरुण ऑनलाईन गेमिंगच्या संपर्कात आला. संबंधित संकेतस्थळ नोंदणीकृत असल्याचा समज झाल्यानंतर त्याने त्यावर स्वतःची नोंदणी केली. संकेतस्थळावर तीनपत्ती, कॅसिनो आणि इतर ऑनलाईन गेम उपलब्ध असल्याचे त्याला दिसले.

गेमिंग कंपनीच्या ग्राहक प्रतिनिधीने केलेल्या मार्गदर्शनानुसार तरुणाने विविध व्यवहारांतून एकूण 1 कोटी 27 लाख 31 हजार 202 रुपये संबंधित कंपनीच्या खात्यात जमा केले. मात्र, त्यानंतर या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version