| खांब | प्रतिनिधी |
भारतीय संस्कृतीला विविध प्रकारचे सण उत्सवाची मोठी परंपरा लाभली आहे. त्यातच दिपावली सणदेखील खुप मोठा असल्याने या सणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे दिनविशेष आहेत. त्यामुळे दिपावली या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील सर्वच वर्गामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने दिपावली सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठीच गर्दी दिसून येत आहे. कपड्यांची दुकाने, किराणा व्यापारी, भांड्याची दुकाने, कटलरी सामान, स्विटवाले, फटाक्यांचे स्टॉल आदी दुकानात मोठी गर्दी होऊ लागली आहे. तसेच, ग्राहकवर्गाच्या वाढत्या गर्दीमुळे व्यापारी वर्गामध्येही उत्साह दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे बाजारात काही वस्तूंचे दर जरी वाढले असले, तरी ग्राहकवर्गाचा उत्साह मात्र कायम आहे.







