जिल्ह्यात माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिरात गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात माघी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या मंदिरांत गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अलिबागमधील कुलाबा किल्ल्यातील गणेश मंदिर, पाली येथील बल्लाळेश्वर, महड येथील गणरायाच्या मंदिरांसह जिल्ह्यातील वेगवेळे मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. यानिमित्त सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमही ठिकठिकाणी राबविण्यात आले.


कुलाबा किल्ल्यातील सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात लहान-मोठी दुकाने सजली होती. त्यामध्ये हार, फुलांसह पूजेचे साहित्य व अन्य पदार्थ विक्रीची दुकाने होती. त्यामुळे त्याठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. यंदाही कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने किल्ल्यात चोख व्यवस्था ठेवली होती. ओहोटीच्या वेळेत तसेच भरती असतानाही गणेशभक्तांचा ओघ सुरुच होता. यावेळी किल्ल्यात जाण्यासाठी घोडागाड्यांसह बोटीही तैनात होत्या. अलिबागमधील एसटी स्थानकातील मंदिरात एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनीदेखील जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. पाली येथील बल्लाळेश्वर, महड येथील वरदविनायक या मंदिरांसह जिल्ह्यातील अनेक मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

माघी गणेशोत्सानिमित्त काही ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. काही ठिकाणी सकाळपासून भजनांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे सकाळपासून जिल्ह्यात मंगलमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

Exit mobile version