मटण, चिकन व मासळीवर ताव

भाऊबीजनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात भाऊबीज सणासाठी मांसाहारावर भर दिल्याचे पहावयास मिळाले. भाऊबीजेनिमित्त रविवारी (दि. 3) सर्वत्र मटण व चिकन तसेच मासळी खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. भाऊबीजेला रविवार आल्यामुळे सर्वांनीच मांसाहारावर ताव मारला. सर्वच मटण, चिकन व मासे मार्केटमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची तोबा गर्दी होती. काही ठिकाणी तर खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या.

पालीतील फिरोज तांबे या मटण विक्रेत्याने सांगितले की, भाऊबीज व रविवार असल्यामुळे गर्दी होणार हे माहीत होते. त्यामुळे आदल्या दिवशी सर्व तयारी व नियोजन करून ठेवले होते. ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना मटण दिले. व्यवसायही चांगला झाला. तर, हेमंत राऊत यांनी सांगितले की, ग्राहकांची खूप गर्दी होती. मात्र, भाव हे नेहमीप्रमाणेच ठेवले, त्यामुळे ग्राहक आनंदी होते. तर गौरी मनोरे या मासळी विक्रेतीने सांगितले की, मटण व चिकनबरोबरच मासळीवरदेखील अनेक खवय्यांनी ताव मारला. मासळी खरेदीसाठी खूप गर्दी होती. ग्राहकांसाठी ताजी मासळी आणली होती आणि योग्य दरामध्ये विकली.

भाऊबीजेनिमित्त अनेक बहिणी भावाकडे आल्या होत्या. तर काही भाऊ बहिणीकडे गेले होते. आणि त्यानिमित्ताने मांसाहारावर सर्वांनीच ताव मारला आणि भाऊबीजेचा येथेच आनंद घेतला.

Exit mobile version