चिकन, मटण दुकानावर गर्दी
मांसाहारासोबत रिचवले मद्याचे पेले
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
श्रावण महिना सुरू होण्याआधी गटारी हा सण रायगडात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रविवार आणि गटारी अमावस्या जोडून येणं म्हणजे चिकन आणि मटण खवय्यांसाठी पर्वणीच. रविवार आला असल्याने गटारी जोरदार साजरी केली गेलीय गटारी असल्याने मटण, चिकन तसेच मद्याच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. मटण, चिकन व्यवसायिकांचा धंदाही तेजीत राहिला.
गटारीनिमित्त रायगडात साधारण चार ते पाच हजार बोकड कापले गेले. मटणासोबत मद्यपीच्या रांगा वाईन शॉपवर पाहायला मिळाल्या. गावागावात एकत्रित बोकड कापून नागरिकांनी आपले मटणाचे वाटे घरी नेले.
श्रावणात अनेक जण मांसाहार टाळत असतात. श्रावण सुरू होण्याआधी गटारी साजरी केली गेली. गटारी असल्याने मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र येऊन गटारी साजरी करतात. मटणासोबत मद्याचे घोट रिचवले. मटण, चिकन खरेदीसाठी पहाटे पासून ग्राहकाच्या रांगा दुकानाबाहेर लागलेल्या होत्या. रविवार असल्याने गटारी अमावस्या जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. मटण, चिकन व्यवसायिकांनीही जास्तीचा माल भरलेला होता.