मुंबई | प्रतिनिधी |
गोर बंजारा समाजाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे रविवारी पहाटे लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.सोमवारी सकाळी 11 वाजता मूळ गावी लोहगड, अकोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मखराम पवार यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मखराम पवार 1990 मध्ये मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढे ते 1998 मध्ये विधान परिषदेवरही निवडून गेले होते. 1998 ते 2001 या कालावधीत ते राज्याचे व्यापार आणि वाणिज्य. दारुबंदी प्रचार कार्य आणि खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रीही होते. मखराम पवार हे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाचे ते पहिले आमदार होते. मखराम पवार यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.