कोंडजाईत भाविकांची गर्दी

| तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील कोंडजाई देवी उत्सवासाठी भाविकांची गर्दी उसळली असल्याचे चित्र पहायला मिळाले. तळेगांव येथे असलेल्या कोंडजाई देवीचा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. कोंडजाई मंदिराचा इतिहास पाहता यादव काळात तळेगाव येथील कोंडीजवळ सुवर्णकारांची वसाहत निर्माण झाली इतिहासाचा मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात आले की दैवज्ञ ब्राम्हण असलेले वेदक गोव्याच्या पलीकडील कर्नाटकमध्ये त्यांचे पूर्वज आदिशंकराचार्य मठ परिसरात बाराशे वर्षांपूर्वी होते. तेथून ते कोल्हापूर येथे गेले.या शिलाहारकाळात सुवर्णकार संपन्न होते.त्यांना राजाश्रय असल्यामुळे ज्या गावात गेले तेथे त्यांनी त्यांच्या कुलदेवतेचे मंदिर उभारले. कोल्हाई(कोल्हापूर), भोलाई (भोर), आणि महालक्ष्मी(कामपूर)येथे आपल्या कुलदेवतेची प्रतिष्ठापना केली.कोकणात पोतदारकीची सनद मिळाल्यानंतर ते भोरमार्गे राजपुरी सुभ्यात उतरल्याचा उल्लेख वंशावळीमध्ये आहे.

मंदा नदी जेथे कोंडीत अडकली आहे तेथे त्यांच्या कुलदेवतेचे मंदिर बांधल्यावर त्या देवीला कोंडजाई म्हणू लागले. याठिकाणी बारामाही पाणी आहे.कोंडजाई येथे कौलारू छप्पर असलेले मंदिर बांधावे असे सर्व वेदक बंधूंनी ठरविल्यावर गणेश पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली या संस्थेने साडे दहा फूट बाय साडे तेरा फूट आकाराचे मंदिर बांधण्याचे कंत्राट चारशे रुपयांना रघुनाथ कल्याणकर यांना दिले त्यांनी सुमारे वीस दिवसात कौलारू मंदिर बांधून तयार केले मंदिर तयार झाल्यावर चौथर्‍यावर कोंडजाई, चंडिका,व गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पौष शुद्ध दशमी 2 जानेवारी 1966 रोजी दत्तात्रय पोतदार या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.

वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे या हेतूने पौष शुद्ध दशमीला दरवर्षी कोंडजाई देवीचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात पडला.यामुळे दरवर्षी हजारो भाविक देवीच्या उत्सवाला येत असतात.उत्सव कमिटी मार्फत निवास आणि भोजनाची व्यवस्था होत असल्याने मुंबई, पुणे,ठाणे,पालघर आदी शहरातील देविभक्तांची देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

Exit mobile version