आषाणे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेला आषाणे धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण बनला आहे. गेल्या महिन्याभरात याठिकाणी लाखो पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही प्राप्त झाला आहे.

कर्जत-कल्याण मार्गावर आषाणे गावाच्या मागील बाजुस असलेल्या डोंगरावरून उडणारे पाण्याचे तुषार खाली 40 फुटावर झेलण्यासाठी पर्यटक वर्षा सहलीच्या निमित्ताने याठिकाणी येतात. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे या धबधब्याचा डोह आहे. तेथून तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पर्यटक पाणी वाहून नेणार्‍या ओढ्यात बसून पाण्याच्या आनंद घेतात. या धबधब्यावर धोका नसल्याने कुटुंबसह पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आषाणे येथे येतात. या धबधब्याचे आकर्षण हे रस्त्याने जाताना डोंगरावरून उतरणारे पाण्याचे तीन प्रवाह. त्याचवेळी तेथे जाणे सहज शक्य असल्याने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. या धबधब्याकडे पावले वळण्याचे आणखी एक कारण म्हणजे वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना रुचकर, गावरान पद्धतीचे जेवण उमरोली आणि आषाणे गावात सहज उपलब्ध होते. गरमागरम भजी, वडे हे डिकसळ नाक्यावर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर त्याची चव देखील सहज घेता येते.

चहा,कॉफी आणि मक्याची कणसे सोबतीला असतात. विकेंडला हजारोच्या संख्येने येणार्‍या पर्यटकांकडून करण्यात येणारा कचरा वेळोवेळी वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संकलित केला जातो. काळजी घ्या धबधब्याच्या मुख्य डोहात पाणी प्रचंड प्रमाणात कोसळत असल्यास पाण्यासोबत अनेकदा दगड वाहून येतात. हे दगड पाण्याच्या प्रवाहाखाली असलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून अपघात होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version