मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यातील तापमानाचा पारा गेल्या आठ दिवसांपासून वाढता असून शुक्रवारी (दि.24) दुपारपर्यंत पारा 40 अंश सेल्सियसवर पोहचला होता. तरीदेखील उन्हाळी सुट्ट्यांमुळे जंजिरा जलदुर्ग, मुरूड समुद्रकिनारा तसेच काशीद व नांदगाव समुद्रकिनार्‍याकडे पर्यटकांची बेफाट गर्दी झाली होती. यावेळी वाढलेल्या तापमानामुळे पर्यटक आणि मुरुडकरांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसून आली. अनेकांनी शहाळी, तातगोळे, थंड पेये खरेदीसाठी मोर्चा वळवला असल्याचे जागोजागी दिसले.

शनिवार-रविवारी आणि शेवटच्या आठवड्यात मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन समुद्रकिनारपट्टीवर मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात 26 मे पर्यंत वादळी तुफानाचा इशारा देण्यात आल्याने जंजिरा जलदुर्गाकडे जाणार्‍या शिडाच्या बोटी बाहेर काढल्या जाऊ शकतील, अशी माहीती पुरातत्व विभागाचे अधिकार्‍यांनी दिली आहे. यामुळे जंजिरा जलदुर्गाचे दर्शन पर्यटकांना घेता येईल की नाही, याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. या आधीच जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसून येत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूर, श्रीवर्धन, रोहा, अलिबाग, मुंबई, पुणे भागातून पर्यटकांची सुमारे 500 वाहनांतून जंजिरा पाहण्यासाठी आल्याची माहिती मुरूड नगरपरिषद टोल नाका कर्मचार्‍यांनी दिली.

Exit mobile version