अपुर्या फेर्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये सध्या पर्यटकांनी एकच गर्दी केली असून मिनी ट्रेन प्रवासाकरिता तिकीट मिळवण्यासाठी प्रवासी माथेरान स्थानकामध्ये तासंतास वाट पाहताना दिसून येत आहे. अपुर्या फेर्या व मिनी ट्रेनला असलेले मर्यादित बोगींची संख्या यामुळे अनेक पर्यटकांना मीनी ट्रेन सफारीला मुकावे लागत आहे.
माथेरानच्या पर्यटनामध्ये मिनी ट्रेन हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच माथेरान मिनी ट्रेनला माथेरानची जीवन वाहिनी म्हणून ओळखले जाते. मिनीट्रेन सफारी करिता देशविदेशातून अनेक पर्यटक माथेरानला भेट देत असतात. देशातील इतर हील रेल्वे पेक्षाही ही ट्रेन लहान असून अनेक छोटी मोठी नागवळणे घेत 21 कि.मी चा प्रवास करीत ही गाडी माथेरान स्थानकात पोहचते. नेरळ ते माथेरान या मार्गावर सध्या नेरळ होऊन दोन तर माथेरानवरून दोन अशा चार फेर्या नेहमी सुरू आहेत. तर, माथेरान स्थानक ते अमन लॉज दरम्यान शटल सेवेच्या नियमित 16 फेर्या सुरू असतात या फेर्यांना पर्यटकांचा इतका प्रतिसाद आहे की अनेकांना विना तिकीट परतावे लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत असते. या माथेरानच्या राणीला अर्थात या मिनिट्रेनला पर्यटकांकडून उदंड प्रेम मिळत असते. परंतु, या मिनिट्रेन सेवेच्या मर्यादित फेर्या पाहता पर्यटकांना, आबालवृद्धांना या सफारीपासून वंचित राहावे लागते आहे. त्यामुळे निदान माथेरानमधील मुख्य पर्यटन हंगामावेळी म्हणजेच दिवाळी, नाताळ आणि एप्रिल मे महिन्याच्या पर्यटन हंगामामध्ये या फेर्यांमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.
आम्ही दरवर्षी माथेरानला येतो. मुलांना या छोट्या झुकझुक गाडीची अर्थात मिनिट्रेनची आवड आहे. परंतु, या गर्दीच्या वेळी भरपूर वेळ रांगेत उभे राहून पण तिकीट मिळत नाही. पर्यटन हंगामावेळी तरी मिनिट्रेनच्या बोगी आणि फेर्या वाढविल्या पाहिजेत. बालगोपालांसह जेष्ठ नागरिकांना सोयीचे होईल.
प्रणय कोळी, पर्यटक, ठाणे