टॅक्सी ऐवजी टेम्पो मध्ये बसून जाण्याची वेळ
| नेरळ | प्रतिनिधी |
दरवर्षी 15ऑगस्ट या दिवशी पर्यटक माथेरान मध्ये बहुसंख्येने येत असतात. यावर्षी शनिवारी स्वातंत्र्य दिन आल्याने सलग दोन दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटकांची तोबा गर्दी माथेरान मध्ये आहे. मात्र, नेरळ स्थानकात सकाळी आलेले पर्यटक यांना टॅक्सीदेखील मिळेनाशी झाली आणि त्यामुळे पर्यटकांना मालवाहू टेम्पोमधून माथेरान जाण्याची वेळ आली होती. पर्यटकांची गर्दी दोन दिवस सुरू राहणार असून, पर्यटकांचे मेगा हाल होणार आहेत. त्यामुळे नेरळ- माथेरान घाट रस्त्यात वाहतूक कोंडी आणि वाहनांचे धोकादायक प्रवास सुरू राहणार आहेत.
माथेरान या पर्यटनस्थळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी पर्यटकांच्या गर्दीला पारावार नसतो. त्यामुळे नेरळ- माथेरान घाटरस्ता पर्यटकांच्या वाहनांनी ओसंडून वाहत असतो. सर्वाधिक त्रास नेरळ स्थानकात टॅक्सी साठी उभ्या असलेल्या पर्यटकांचे मेगा हाल सकाळ पासून सुरू झाले. आज सुट्टी असल्याने मुंबई येथून उपनगरीय लोकल ने सकाळपासून पर्यटक येत होते. सकाळी सात पर्यंत नेरळ- माथेरान टॅक्सी सेवा सुरळीत सुरू होती. परंतु, त्यानंतर येणारी उपनगरी लोकल माथेरान जाणाऱ्या पर्यटकांनी भरून येत होत्या, त्यामुळे टॅक्सी पकडण्यासाठी होणारी लाइन हुतात्मा भाई कोतवाल चौक पर्यंत पोहचली. त्यात टॅक्सी देखील नेरळ येथून माथेरान दस्तुरी नाका पर्यंत जाऊन वेळेत नेरळ येथे येत नसल्याने पर्यटकांची गर्दी वाढली. ही गर्दी नेरळ स्टेशन आळी परिसरात गर्दीने भरून गेला होता.







