स्थानिक चहा, वडापाव टपरी धारकांना सुगीचे दिवस
पुणे जिल्हा हद्दीतील रस्त्यावरचे खड्डे भरण्याची पर्यटकांची मागणी
। महाड । जुनेद तांबोळी ।
निसर्गाची मुक्तहस्ते होणारी उधळण मनसोक्त पाहण्यासाठी धबधब्याखाली भिजण्यासाठी, पावसाळी पर्यटनासाठी नेहमीच पसंतीस उतरणारे ठिकाण म्हणजे वरंध वाघजाई घाट परिसर. सुरवातीला 10 महिन्याच्या रस्त्याच्या कामामुळे हा परिसर बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा घाट रस्ता पूर्ववत झाल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र पुणे हद्दीतील वाघजाई मंदिर परिसरातील रस्त्यावर खडे पडल्याने प्रवास करताना पाठीची हाडे खिळखिळीत होत असून या मार्गावरील खड्डे भरण्याची मागणी पर्यटक करत आहेतसोसाट्याचा वारा, पावसाची संततधार व डोगरमाथ्यावरून कोसळणारे धबधबे, ढगांच्या शुभ्र धवलने हिरव्यागार डोगररांगांवर पसरलेले आच्छादन पाहून मनाला प्रसन्नता लाभते. कोरोनामुळे पर्यटन बंद असल्याने तसेच हा घाट मार्ग कामानिमित्त बंद असल्याने याठिकाणी पर्यटक येत नव्हते. मात्र या मार्गावरील रायगड हद्दीतील काम पूर्णत्वास गेल्यानंतर हा मार्ग पूर्ववत सुरू झाला.
शनिवारी व रविवारी या ठिकाणी असंख्य पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली. पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणार्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा 20-25 किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे.घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातले हिरडोशी गाव आहे. मध्यात वाघजाई मंदिर आहे व उताराच्या शेवटाला कोकणातली माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे येतात. तेथून कोकणात अन्यत्र जाणारे रस्ते आहेत. वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात.
वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला आहेत. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाकी आहेत. तर दुसर्या बाजूस अशीच काही टाकी व शिवबंदीच्या घरांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी इ.स. 1857 मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली.मात्र या मार्गाकडे राज्य शासन, स्थानिक प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने हा मार्ग रुंदीकरणापासून अलिप्त राहिला आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जवळचा मार्ग म्हणून या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा मागणी करूनही या रस्त्याच्या मजबुतीसह रुंदीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
रायगड जिल्ह्यांतर्गत रस्त्याच्या कामाचा दर्जा व्यवस्थित असला तरी घाटाच्या दोन्ही टप्प्यात खड्डे पडले आहेत; तर काही ठिकाणी माती टाकण्यात आल्याने मुसळधार पावसामुळे वाहने स्लिप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.