कोकणी चव, पारंपरिक स्वागत आणि स्थानिकांच्या आपुलकीचा अनुभव
। रेवदंडा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा समुद्रकिनारा सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजला आहे. निसर्गरम्य किनारा, पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक आगरकोट किल्ला आणि स्थानिक कोकणी माणसांच्या आपुलकीच्या स्वागतामुळे रेवदंडा हे कोकणातील एक हॉटस्पॉट ठरत आहे.
राज्यभरातून येथे येणारे पर्यटक शांत, स्वच्छ आणि मनोहारी समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवत आहेत. यासोबतच मासे, खेकडे, अळूवडी, सोलकढी, उकडीचे मोदक अशा खास कोकणी चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत आनंद लुटत आहेत. या पारंपरिक चवींमुळे स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, अनेकांनी घरगुती जेवण व्यवस्था, लहान हॉटेल्स आणि होमस्टे सुरू केले आहेत. रेवदंड्यातील माणसं साधी, मनमिळावू आणि अतिशय आपुलकीने पर्यटकांचे स्वागत करतात. पर्यटकांना घरचे वातावरण देणारी ही माणसं हे रेवदंड्याचे खरे वैभव ठरत आहेत. त्यांच्या आतिथ्यशीलतेमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव अविस्मरणीय ठरतो आहे.
विशेष आकर्षण - आगरकोट किल्ला
रेवदंड्याच्या ऐतिहासिक गौरवात भर घालणारा आगरकोट किल्ला हे या भागाचे विशेष आकर्षण ठरत आहे. पोर्तुगीज स्थापत्यशैलीत उभारलेला हा किल्ला समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार आहे. किल्ल्याच्या भिंतीवरून दिसणारा समुद्राचा देखावा पर्यटकांना वेगळ्याच जगात घेऊन जातो.
गावाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ
स्थानिक तरुणांनी पर्यटनव्यवसायाला आधुनिकतेची जोड देत ऑनलाइन बुकिंग, सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी, आणि लॉजिंग सुविधांमध्ये सुधारणा करून गावाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले आहे. महिलांसाठी सुरक्षित व मर्यादित स्वरूपातील व्यवसायाची संधी निर्माण झाल्यामुळे अनेक घरांमध्ये आर्थिक स्वावलंबनास सुरुवात झाली आहे.
रेवदंडा आज केवळ एक पर्यटनस्थळ न राहता कोकणच्या सौंदर्याचे, चविचे, इतिहासाचे आणि आपुलकीचे जिवंत प्रतीक बनले आहे. येथील समुद्रकिनारा, पारंपरिक कोकणी पदार्थ, ऐतिहासिक वारसा आणि माणुसकीच्या नात्याने गुंफलेली संस्कृती पर्यटकांना पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडत आहे.