निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
। माथेरान । वार्ताहर ।
हरित तृणांनी पसरलेले मखमालीचे डोंगर सर्वत्र दिसतात पण या महिन्यात निसर्गाची किमया माथेरानमध्ये पहावयास मिळते. हिरवेगार डोंगर पिवळा साज चढवून सोन्यासारखे दिसत आहेत.ही पर्यटकांसाठी निसर्गाने दिलेली भेट आहे. हे पाहण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये येत आहेत.
पावसाळी पर्यटन हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये निसर्गामध्ये आमूलाग्र बदल होताना हमखास दिसतात. परतीचा पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सूर्यकिरण माथेरानच्या भूमीला स्पर्श करतात. काही ठिकाणी रिमझिम पाऊस त्यामध्ये डोंगरावर दिसणारे इंद्रधनुष्य पाहून पर्यटक अतिशय आनंदी होतात. पण ऑक्टोबरमध्ये नवरात्री उत्सवात माथेरानच्या सातशे हेक्टरमध्ये सभोवताली पिवळ्या फुलांनी डोंगराचे रुपडे पालटून जाते. या फुलांना सोनकी किव्हा छोटे सुर्यफूल असेसुद्धा म्हणतात.
डोंगरांमध्ये असणारे सफेद फेसाळलेले धबधबे, काही ठिकाणी हिरवे गवत आणि त्यामध्ये आलेली ही सोनकी एक निसर्गाचे वरदानच आहे. ज्यावेळेस या सोनकीच्या फुलांवर सूर्यकिरण पडतात. त्यावेळी संपूर्ण डोंगर हा सोन्यासारखा दिसतो. हे दृश्य अतिशय विलोभनीय असल्याने ज्या पर्यटकांना या महिन्याची किमया माहिती आहे. ते आवर्जून पाहण्यासाठी येतात. नैसर्गिक आलेल्या फुलांना सुगंध जरी नसला तरी लांब डोंगरावर ती फुलल्यावर सर्वत्र पसरल्यानंतर हिरव्या डोंगराचे पिवळ्या रंगामध्ये रूपांतर होते. हे दृश्य नवरात्री होईपर्यंत याची डोळा पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. या फुलांवर फुलपाखरे बागडताना दिसतात. या महिन्यात दिसणारा निसर्ग म्हणजे मुक्त हस्ताने उधळण केलेली डोंगर माथ्यावरील सोनाकीची फुले. या फुलांवर बागडताना फुलपाखरांचे थवे हमखास दिसतात.चतुर आणि फुलपाखरे यांच्यात हवेत स्पर्धा सुरू आहे की काय असा भास होतो. निसर्ग अभ्यासक हे दृश्य अगदी जवळून न्याहाळतात. हा सोनाकीचा खेळ फक्त वीस दिवस असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
पॉईंट्स दिसतात सोनेरी
पर्यटक माथेरानमध्ये आल्यानंतर हमखास पॉईंटवर नक्कीच जातात. पॉईंट म्हणजे डोंगराचे टोक होय. इथून उंचसखल झाडी, काळ्या दगडींपासून बनलेला डोंगर त्यावर हिरवे तृण आणि या तृणामध्ये उगवलेली सोनकीची सोनेरी फुले. हे मनमोहक दृश्य सर्व पॉईंट्सवरून दिसते बाजारपेठेपासून जवळच असलेल्या इको पॉईंटवरून पर्यटक हे दृश्य न्याहाळत असतात.
या नवरात्रीच्या उत्सवात आवर्जून माथेरान पर्यटन स्थळाला भेट देतो. तो येथील बदललेला निसर्ग पाहण्यासाठी. हे दृश्य येथे फक्त वीस ते पंचवीस दिवस पाहवयास मिळते. ज्यांनी कोणी निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहिले नसेल अशा पर्यटकांनी याच दिवसात माथेरानला यावे. असे दृश्य पाहण्यासाठी गेली आठ वर्षांपासून आम्ही येतो.
– अक्षय सहस्त्रबुद्धे, पर्यटक