वाहतूक कोंडी
मुरुड जंजिरा | वार्ताहर |
श्री गणेशाचे पूजा साहित्य आणि उत्सवासाठी गुरुवारी मुरुडच्या मुख्य बाजारपेठेत मोठीच झुंबड उडालेली दिसून येत होती. नागरिकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुचाकी लावल्याने दुपारी जाणार्या येणार्या वाहनांची मोठी कोंडी होत होती. वाहनांची संख्या इतकी होती की पोलिसांचीदेखील नियंत्रण करताना दमछाक होताना दिसून येत होती.
मुरूड हे मुख्य मार्केट असून, सकाळपासून तालुक्यातील नागरिक, ग्रामस्थ साहित्य खरेदीसाठी येथे मोठया संख्येने येताना दिसत होते. म्हसाडी, खारआंबोली, शिघ्रे, कोर्लई, जोसरंजण, नागशेत, विहूर, तेलवडे, वाणदे, येथून काकडी, वांगी, शिराळी, शेवगा, मेथी, कोबी, घेवडा घोसाळी, आळु, भेंडी पोकळा, काळा भोपळा आदी गावांतील गावठी भाज्या खरेदीसाठी मार्केट बाहेरील गल्लीत मोठी गर्दी दिसत होती. म्हासाडी या गावातील गावठी केळीदेखील विक्रीस आली होती. राजेश मूळेकर, माळी फुलवाले येथे हार वेण्या खरेदीसाठी महिलाची विशेष गर्दी होती. मार्केट, बाजारपेठ परिसर खरेदीसाठी परीसर फुलून गेला होता. आदिवासी भगिनींनी आणलेली शमी, दुर्वा, केळीची पाने आणि गणेश पूजा साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची वर्दळ होती.