| खोपोली | प्रतिनिधी |
लोणावळा येथील पांगोळी धनगरवस्ती परिसरातील प्रसिद्ध श्रीसंत बाळूमामा मंदिरात अमावास्येनिमित्त शनिवारी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भव्य मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, प्रत्येक अमावास्येला येथे विशेष भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असल्याने राज्यभरातून भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. शनिवारीही सकाळपासून महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्रीसंत बाळूमामांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला.
गेल्या बारा वर्षांपासून पांगोळी धनगरवस्ती येथे उभारण्यात आलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. दिवसेंदिवस मंदिरातील भक्तसंख्या वाढत असून अनेक भाविक नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण झालेल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी येथे येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आजच्या अमावास्या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्रीसंत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आदर्श सरपंच बबन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी नियोजनबद्ध व्यवस्था सांभाळत भाविकांची सेवा केली. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. “जय बाळूमामा”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606