| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
छत्रपती शिवरायांचे पदस्पर्श लाभलेल्या प्रसिद्ध ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अश्विन नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर असंख्य भाविक येतात. त्यामुळे येथील परिसर भक्तिमय व उत्साही होणार आहे.
नवरात्रोत्सवात मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक, सायंकाळी आरती, रात्री किर्तन असा कार्यक्रम असतो. अष्टमीच्या दिवशी गडकर्यांना मानाप्रमाणे नारळ व मानाचे विडे दिले जातात. शिलंगणाचे दिवशी पालखी निघते. नवरात्रात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो. पंतसचिव चिमणाजी रघुनाथ उर्फ नानासाहेबांनी पुत्रप्राप्ती झाल्यानंतर येथे 10 दिवसांच्या आश्विन नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. त्याकाळात उत्सव साजरा करण्याची जबाबदारी तालुक्याचे मामलेदार यांच्यावर होती.
ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद
देवीच्या दर्शनासाठी किल्यावर येणारे भाविक आजुबाजूचा गर्द झाडीने नटलेला मनोहारी परिसर, वाहते धबधबे, नद्या, डोगररांगा, थंड हवा यांचाही आनंद लुटत असतात. शिवाय या ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक वस्तूंना भेट देतात. त्यामुळे त्यांना तिहेरी पर्यटनाचा आंनद मिळतो.







