उष्णता व वाहतूक कोंडीची चिंता कायम
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात रेवदंडा समुद्रकिनारा आणि परिसरातील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. उन्हाळी सुट्टीचा शेवटचा टप्पा असल्याने कुटुंबे, युवक-युवती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे काही दिवसांपासून मंदावलेली पर्यटकांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसून आले.
समुद्रकिनाऱ्यावर बालकांनी वाळूचे किल्ले उभारण्याचा आनंद घेतला, तर युवकांनी छायाचित्रण आणि समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. पर्यटकांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे स्थानिक हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि किरकोळ व्यवसायांनाही दिलासा मिळाला. मात्र, वाढती उष्णता आणि दमट हवामानामुळे अनेक पर्यटक त्रस्त झाले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उकाडा मोठे आव्हान ठरत असल्याने अधिक सावली, थंड पिण्याचे पाणी आणि विश्रांती सुविधांची गरज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रेवदंडा-चौल-बागमळा मार्ग तसेच अलिबाग-मुरुड रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. सुट्टीच्या काळात सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पेट्रोल-डिझेल दरवाढ, एलपीजी खर्च आणि इतर वाढलेल्या खर्चामुळे काही पर्यटन सेवांचे दर वाढले आहेत. त्यामुळे कुटुंबांसाठी पर्यटनाचा खर्च वाढल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने 26 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव पॅरासेलिंग, बनाना राईड, स्पीड बोट यांसारख्या जलक्रीडांवर बंदी घातल्याने स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याबरोबरच किनाऱ्यांवर मूलभूत सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. योग्य नियोजन आणि सुविधा उपलब्ध झाल्यास रेवदंडा परिसरातील पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
