| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात सध्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. महसूल प्रशासनाचे कोणतेही भय या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना राहिलेले नाही. ज्याला वाटेल त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे उद्योग सुरू आहेत. असाच एक प्रकार श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविल समुद्रकिनारी घडला आहे. या ठिकाणी कोयला नावाचे हॉटेल भरती रेषेवरच बांधकाम करून बांधण्यात आलेले आहे. याबाबत या ठिकाणाची ग्रामपंचायत, तलाठी, सर्कल या कोणाचेच कसे लक्ष गेले नाही, अशी शंका स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.
एकेकाळी निर्मनुष्य असलेला श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविल हा समुद्रकिनारा आता अनधिकृतपणे बांधण्यात आलेली हॉटेल्स व स्टॉल्स यामुळे गर्दीने फुललेला पाहायला मिळतो. या समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बहुतेक हॉटेल मालकांनी वनखात्याच्या जागेतून मार्ग काढलेला आहे. परंतु, वनविभागाचे अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाहीत. काही महिन्यांपूर्वी याच अरावि कोंडविल किनाऱ्यावरती श्रीवर्धन बाहेरील काही नागरिकांनी येऊन, स्टेज बांधून लग्न लावण्याचा प्रकार देखील घडला होता. मात्र, अनधिकृत बांधकामाचे एवढे गंभीर प्रकार घडत असताना श्रीवर्धन महसूल विभाग कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.







