| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात वाढत असलेली बेकायदेशीर गोहत्या आणि गोवंश तस्करी ही सर्वांसाठी चिंतेची आणि संतापजनक बाब ठरत आहे. श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेचे रक्त आपल्याच मातीत सांडत आहे. त्यामुळे गोहत्येच्या वाढत्या घटनांविरोधात आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्यावतीने मुरूड शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तरूणांचा मोठा सहभाग होता. यावेळी मुरूड पोलीस ठाण्यामार्फत आरसीपी, दंगल नियंत्रण पथक व पोलीस पथकातील 150 पोलिसांसह 5 अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी कल्याणी हॉस्पीटल आझाद चौक येथुन या भव्य जनआक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर हा मोर्चा आझाद चौक येथून नगरपरिषद कार्यालय, गणेश आळी नाका, मारुती नाका, दरबार रोड, तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद-बजरंग दल कार्यकर्त्यांनी मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे गोवंश तस्करी आणि हत्येशी संबंधित मुख्यमंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन सादर केले.







