सीएसके लिलावासाठी सज्ज

रणनीती तयार; मॅच विनरसाठी ताकद लावणार पणाला
मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनसाठी सगळे संघ सज्ज झाले आहेत. चारवेळा आयपीएल जिंकणार्‍या चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा, ॠतुराज गायकवाड आणि मोईल अलीला रिटेन केले आहे. सीएसकेमध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत. मात्र रिटेन पॉलिसीनुसार कमाल चार खेळाडूंनाच संघात कायम ठेवता येते. त्यामुळे सीएसकेला काही बड्या खेळाडूंना रिटेन करता आलेले नाही.
पुढील आयपीएलसाठी होणार्‍या लिलावात कोणत्या खेळाडूला सर्वप्रथम ताफ्यात घेतले जाईल याची माहिती सीएसकेकडून देण्यात आली आहे. मॅच विनर फाफ ड्युप्लेसिसला संघात घेण्यासाठी सीएसके प्रयत्न करणार आहे. चार खेळाडूंनाच रिटेन करण्याचा नियम असल्याने सीएसकेने ड्युप्लेसिसला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेने आतापर्यंत मिळवलेल्या यशात ड्युप्लेसिसचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सीएसकेला पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी सीएसके जोर लावणार आहे.
सीएसकेने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये सीईओ काशी विश्‍वनाथ यांनी लिलावात संघाची काय रणनीती असेल त्यावर सूचक भाष्य केले. ड्यूप्लेसिसने संघात परतावे असे आम्हाला वाटत आहे. त्याने आमच्यासाठी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. दोन हंगामात त्याच्या कामगिरीमुळे आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे त्याला संघात पुन्हा आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे विश्‍वनाथ यांनी सांगितले.

Exit mobile version