दररोज 50किलो मिरचीची काढणी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात शेती हा हजारो शेतकर्यांचा उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी हे पाण्याचा वापर करून शेती करतात आणि आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.जिते गावातील शेतकरी कुटुंबाने भाजीपाला शेती केली आहे. मात्र तब्बल दोन एकर जमीनीवर हिरव्या मिरचीची शेती केली असून दररोज 50हुन अधिक किलो मिरची विक्रीसाठी काढणी या शेतातून केली जाते. जाधव कुटुंब या आपल्या भाजीपाला शेती मधून खुश असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील जिते गावातील शरद जाधव यांची शेती नेरळ कशेळे रस्त्याच्या बाजूला या आहे. या रस्त्याच्या काही मीटर अंतरावरून उल्हास नदी वाहते. या नदीमध्ये बारमाही पाणी असते आणि त्याचा फायदा या भागातील शेतकरी उन्हाळी शेती करतात. शेतीमधून दरवर्षी विविध प्रकारच्या भाज्या आणि पालेभाज्या यांचे उत्पन्न घेणारे जाधव यांनी यावर्षी स्थानिक वडापाव विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांची मागणी लक्षात घेऊन मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी नेरळ येथील कृषी केंद्रातून लवंगी आणि सातेरी मिरची यांची बियाणे आणून रोपे तयार केली. दोन एकर जमिनीवर या रोपांची लागवड वाफ्यांवर केली. त्या वाफ्यांमध्ये पाण्याचे नियोजन केले.मार्च महिन्यापासून मिरचीचे पीक हाती येऊ लागल्यावर शरद जाधव यांनी लवंगी आणि सातेरी मिरचीचे ग्राहक शोधण्यासाठी नेरळ आणि कशेळे येथील बाजारात जाऊन भाजीपाला विक्रते आणि बटाटा वडा विक्रेता यांची भरत घेतली.
हिरवीगार लवंगी मिरची आणि सातेरी मिरची यांचे उत्पन्न पाहून मोठ्या प्रमाणात घाऊक व्यापारी यांनी मिरचीची मागणी केली आणि आता दररोज 50 ते 70किलो मिरची यांची विक्री होत असते. हिरवीगार आणि तिखट अशा मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत असून जाधव यांच्या शेतात शरद जाधव यांना त्यांच्या पत्नी शारदा जाधव आणि दोन्ही मुले यांची मदत होत असते.गिरीश जाधव आणि गौरव जाधव हे दोघे मिरची काढून बाजारात नेवून विकण्याचे काम करतात तर शरद जाधव पाण्याचे नियोजन करतात. या शेतातून निघणारी मिरची किरकोळ बाजारात 100 रुपये दराने विकली जात आहे,तर होलसेल बाजारात 70 ते 80 रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे मिरचीची शेती करण्याचा उपक्रम यशस्वी झाला आहे.
आम्हाला दररोज ताजी मिरची लागते आणि हि मिरची आपल्या जवळच्या शेतात आणि ती देखील हिरवीगार तिखट मिळू लागली आहे. त्यामुळे आमच्या बटाटा वड्याला चव देखील वाढली आहे.
रोशन पाटील,
मालकपाटील वडा