कर्जतमध्ये ‌‘लाल भेंडी’ ची शेती

शेतकरी नवनाथ शेळकेंचा यशस्वी प्रयोग

| नेरळ | प्रतिनिधी |

आजपर्यंत आपण हिरवी भेंडीची शेती बघितली आहे. पण, आता लाल भेंडीचे उत्पादनदेखील घेण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील आर्डे गावातील प्रगत शेतकरी नवनाथ शेळके यांच्या शेतात चक्क लाल रंगाचे भेंडी तयार झाली आहे. अजंटा कंपनीचे कुमकुम जातीचे वाण कृषी विभागाने उपलब्ध करून दिले होते. जेमतेम एक फूट उंचीचे झाड या नवीन संकरित बियाणाासून तयार होत आहे. या भेंडीला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

कर्जत तालुका पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आणि प्रयोगशील शेती करण्यास पुढाकार घेतला. त्यातून आजच्या घडीला शेकडो शेतकरी हे प्रयोगशील शेती करून प्रगतशील शेतकरी बनले आहेत. कोकणात न होणारी पिके येथील शेतकऱ्यांनी घेतली असून, तालुक्यातील आर्डे गावातील नवनाथ शेळके यांनी आपल्या शेतात लाल भेंडीची शेती केली आहे. अजंटा कंपनीने कुमकुम हे संकरित वाण विकसित केले आहे. त्या वाणाची उत्पादन क्षमतादेखील अधिक असून, कुमकुम जातीच्या लालसर रंगाच्या भेंडीला बाजारात 70-80 रुपये किलो एवढा भाव आहे. अल्प उंचीचे झाड आणि बरोबर भेंडीच्या अन्य वाणाप्रमाणे लाल रंगाची भेंडी उत्पादन घेता येते. कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन फुलसुंदर यांनी हे वाण उपलब्ध केले असून, कर्जत आणि खालापूर तालुक्यात केवळ नवनाथ शेळके यांच्या शेतात पाच गुंठे क्षेत्रात हे पीक घेतले आहे.

नवनाथ शेळके यांनी पाझर तलावाच्या पाण्यावर ही शेती केली आहे. या पिकाचे उत्पन्न चालू झाले असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे. कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, कृषी पर्यवेक्षक कळंब सचिन केने आणि कृषी सहाय्यक साळोख तर्फे वरेडी विजय गंगावणे यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचललेली आहेत, याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लाल भेंडीचे फायदे
लाल भेंडीला कुमकुम भेंडीदेखील म्हणतात. ही भेंडी अतिशय पौष्टिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये जास्त उगवली जाणारी ही भेंडी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकते. सामान्य हिरव्या भेंडीच्या तुलनेत या लाल भेंडीचे पीक 45 ते 50 दिवसात तयार होते. कृषी वैज्ञानिकांनुसार ‌‘लाल भेंडी'मध्ये 94 टक्के पॉलीअनसेचुरेटेड फॅट्स असतात. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात.
आरोग्यासाठी फायदेशीर
या भेंडीमध्ये 66 टक्के सोडियम असते. तसेच यामध्ये असणारे 5 टक्के प्रोटीन हे शरीरातील मेटाबॉलिव सिस्टिमला चांगले ठेवते. लाल भेंडीमध्ये एंथोसायनिन आणि फेनोलिक्स असते. यामुळे शरीरातील पोषण मूल्ये वाढतात. या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी कॉम्प्लेक्सदेखील आहे. लाल भेंडी ही गर्भवती महिला, मुलांचा मानसिक विकास आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. लाल भेंडी हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील फायदेशीर आहे.
Exit mobile version