कर्जतमध्ये गावठी कडधान्याची लागवड

विनय वेखंडे यांची सेंद्रिय शेतीत प्रयोग

| नेरळ | वार्ताहर |

राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे हे कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जातात. वदप येथील यावर्षी त्यांनी आपल्या शेतात कडधान्य पिकांची शेती केली आहे. त्यांच्या शेतात यावर्षी वाल, मूग, तुर,चणे यांची शेती बहरलेली असून त्यांच्या शेतातील सेंद्रिय जमिनीवर पिकवलेली कडधान्य नवी मुंबई येथील बाजारात चांगला बाजारभाव मिळवत आहेत.

कर्जतच्या पूर्व भागात वदप येथे विनय वेखंडे यांची मिलिंद बाग येथे शेती आहे. त्या शेती मध्ये दरवर्षी साधारण 15 एकर जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची शेती करतात. भाताच्या शेती बरोबर यावर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणात कडधान्य शेती केली होती. वाल, तुर, मूग, मटकी, हरभरा चणे यांचे शेती त्यांनी साधारण सहा एकर जमिनीवर केली होती. त्यात वालाचे गावठी बियाणे यांचा वापर करून दोन एकर जमिनीवर तर तुर डाळीचे उत्पन्न घेण्यासाठी गावठी तुरीचे उत्पादन घेण्यासाठी एक एकरात बियाणे टाकले होते.त्याचवेळी हिरवे मूग यांचे दोन एकरात शेती केली होती.त्याचवेळी घरगुती वापरासाठी हरभरा आणि मटकी यांची देखील लागवड विनय वेखंडे यांनी आपल्या शेतात केली होती. नोव्हेंबर महिन्यात या सर्व शेतीसाठी ट्रॅक्टर मधून नांगरणी करून बियाणे यांची पेरणी केली. मार्च महिन्यात त्यांच्या शेतामधून तब्बल 500 किलो वालाचे उत्पादन निघाले असून तुर डाळी साठी वापरली जाणारी तुर यांचे उत्पादन काढणीवर आहे. ते देखील साधारण 200 किलो उत्पादन होईल असा कयास तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड आणि मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी यांनी व्यक्त केला आहे. तर दोन एकर जमिनीवर टाकलेल्या बियाणे मधून तब्बल 500 किलो मूग याचे उत्पादन झाले आहे. हरभरा शेतीमधून चणे यांचे झालेले उत्पादन हे आपल्या नातेवाईक यांच्यासाठी राखीव ठेवले आहे.

वालाचे शेंगांची पोपटी विशेष लोकप्रिय असते आणि त्यासाठी गावठी वालाची शेंगा खरेदी करण्यासाठी खवय्ये हे वदप येथे येऊन कच्च्या शेंगा खरेदी करायचे. त्यानंतर गावठी वाल यांचा बिर्डा अगदी चवीष्ट असतो आणि त्यामुळे त्यासाठी महिला वर्ग गावठी वाल आपल्या घरी साठवून ठेवत असतात. गावठी वाल याला मोठी मागणी असून सर्व वाल विनय वेखंडे यांनी नवी मुंबई येथील बाजारात विकण्यास पाठवला आहे. बाजारात गावठी वाल हा साधारण 180 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे. त्याचवेळी मूग देखील मोठ्या विक्री साठी उपलब्ध असून हिरव्या मूग याला मोठी मागणी आहे. आज पर्यंत 400 किलो मूग नवी मुंबईत विक्री साठी पाठवला असून तुर काढणी नंतर त्याची देखील विक्री वेखंड हे करणार आहेत. गावठी कडधान्य यांची शेती प्रगत शेतकरी विनय वेखंडे यांच्याकडे विशेष मागणी आहे.

Exit mobile version