लम्पीग्रस्त बैलाचा उपचाराविना मृत्यू; अजप येथील शेतकर्याचे आर्थिक नुकसान
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील अंजप गावातील शेतकरी गणपत परशुराम थोरवे यांच्याकडील खिल्लार बैल लम्पी आजाराचा बळी ठरला आहे. 16 ऑगस्टपासून या बैलाला लम्पी आजाराची लक्षणे दिसत होती. त्याबाबत पशुवैद्यकीय अधिकार्यांना फोन करून कल्पना दिली होती. मात्र, बैलाचा मृत्यू झाला तरी पशुवैद्यकीय अधिकारी हे अंजप गावात पोहोचले नाहीत. दरम्यान, बैलाच्या मृत्युमुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून, त्या बैलाची जबाबदारी घेण्यावरून पशुवैद्यकीय विभाग टाळाटाळ करीत आहे. मात्र, शेतकरी गणपत थोरवे यांनी आपल्या बैलाची नुकसानभरपाई कोण देणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अंजप गावातील शेतकरी गणपत थोरवे हे वडिलोपार्जित शेतीमधून वर्षाकाठी वेगवेगळी पिके घेत असतात. तालुक्यातील एक शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची ओळख असून, ते आपल्या शेतीसाठी आजही नांगर वापरून शेतजमिनीची मशागत करतात. त्यांच्याकडे असलेल्या खिल्लार बैलाला 16 ऑगस्टपासून लम्पीसदृश्य आजाराची लक्षणे दिसून आली होती. त्याबद्दल शेतकरी थोरवे यांनी जवळच्या कशेळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्याबाबत फोनवरून संपर्क साधत कल्पना दिली होती. मात्र, त्या काळात लम्पी आजारावर कोणतेही उपचार झाले नसल्याने शेवटी 21 ऑगस्ट रोजी त्या बैलाचा मृत्यू झाला, असे थोरवे यांचे म्हणणे आहे.
पशुसंवर्धन विभागाने बैलाची काळजी घेण्याची तसदी घेतली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बैलाच्या मृत्यूनंतरदेखील शेतकरी थोरवे यांनी कर्जत येथील पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांना संपर्क साधून बैलाच्या मृत्यूची माहिती दिली होती. परंतु, बैलाच्या मृत्यूनंतर काही तास उलटले तरी कोणताही पशुवैद्यकीय अधिकारी अंजप गावी पोहोचला नाही. त्यामुळे बैलाच्या मृत्यूनंतर पंचनामादेखील पशुसंवर्धन विभागाकडून झाला नाही. त्यामुळे शेवटी पंचनामाविना खोल खड्डा खोदून त्या बैलाचे दफन करण्यात आले. एखादे जनावर लम्पीमुळे मृत्युमुखी पडल्यास सरकारच्या निर्णयाप्रमाणे त्या शेतकर्याला आर्थिक नुकसान देण्याची तरतूद केली आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या कामचुकारपणामुळे गरीब शेतकर्याला बैलाच्या मृत्यूनंतर आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी पशुधन अधिकारी यांना संपर्क केल्यानंतरदेखील ते अधिकारी अंजप येथे पोहचले नाहीत. त्यामुळे शेतकरी गणपत थोरवे यांचे आर्थिक नुकसान होणार असून, शेतकर्याला मदत कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.