24 लाख 46 हजार 153 मतदारांची नोंदणी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये नुकताच निवडणूक विभागाचा पुनर्रिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये 24 लाख 46 हजार 153 मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात 52 हजार 134 मतदारांची अधिक भर पडली आहे. त्यात 28 हजार 923 महिला, 23 हजार 209 पुरुष आणि सात तृतीय पंथीय मतदारांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये सहा ते 20 ऑगस्ट या कालावधीत पुनर्रिक्षण कार्यक्रम झाला. नाव कमी करणे, नावे वाढविणे अशा अनेक प्रकारची कामे वेगवेगळ्या शिबीर व अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली. दावे, हरकती घेण्यात आल्या. एकूण 46 हजार 937 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 29 हजार 760 अर्ज मान्य केले असून, 12 हजार 890 अर्ज अमान्य केले आहेत. तसेच 216 अर्ज प्रलंबित आहेत. त्यामध्ये नाव नोंदणीसाठी 20 हजार 645 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 18 हजार 801 अर्ज मान्य करण्यात आले असून एक हजार 833 अर्ज अमान्य केले आहेत. तसेच अकरा अर्ज प्रलंबित आहेत.
नावे रद्द करण्यासाठी 15 हजार 691 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी पाच हजार 424 अर्ज मान्य केले आहेत. सहा हजार 59 अर्ज अमान्य केले असून, 137 अर्ज प्रलंबित आहेत. अन्य ठिकाणी नावे बदलून घेण्यासाठी दहा हजार 600 अर्ज दाखल झाले असून, पाच हजार 534 अर्ज मान्य केले आहेत. चार हजार 998 अर्ज अमान्य केले असून 68 अर्ज प्रलंबित आहेत. जिल्ह्यामध्ये 24 लाख 46 हजार 153 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये 12 लाख 40 हजार 562 पुरुष व 12 लाख पाच हजार 500 महिला व 91 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदारांवर दृष्टीक्षेप
18 ते 19 वयोगट - 46 हजार 646
80 व त्यापुढील वयोगट - 72 हजार 471
अनिवासी भारतीय - 233
सर्व्हीस मतदार - एक हजार 187
80च्या पुढील महिला मतदार आठ हजारने अधिक
रायगड जिल्ह्यात 80 व त्यापुढील वयोगटातील 72 हजार 471 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 31 हजार 498 व महिला मतदार 40 हजार 973 मतदार आहेत. या मतदारांच्या तुलनेत महिला वयोवृध्द मतदार आठ हजारने अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.
नव पुरुष मतदार सहा हजारने वाढले
रायगड जिल्हयात 18 ते 19 वयोगटातील 46 हजार 643 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष नव मतदारांची संख्या 26 हजार 458 असून महिला नव मतदारांची संख्या 20 हजार 179, तर सहा तृतीय पंथी मतदार आहेत. यामध्ये पुरुष नव मतदारांची संख्या सहा हजारने वाढली असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
मतदान केंद्रात 101 ने वाढ
रायगड जिल्ह्यात यापुर्वी दोन हजार 689 मतदान केंद्र होते. नुकत्याच झालेल्या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान एक हजार 500 मतदार असलेल्या मतदान केंद्रात विभागणी करून दोन मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन हजार 790 मतदान केंद्र झाले आहेत. त्यामुळे मतदान केंद्रात 101 ने वाढ झाली आहे. तसेच पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाच नवीन मतदान केंद्र तयार केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जावळे यांनी दिली.