बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर संताप
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग-रेवस मार्गावरील चिडीपाडा येथे मोरी खचून रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच खानाव-उसर येथे अशाच प्रकारच्या भगदाडामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणताही धडा न घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, चिडीपाडा येथील मोरी धोकादायक झाल्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर पावसामुळे मोरीचा भाग खचल्याने रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. अलिबाग-रेवस हा जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खानाव-उसर दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक मोऱ्या आणि पुलांची तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चिडीपाडा येथील मोरीची तातडीने दुरुस्ती करावी, सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे व इशारा फलक लावावेत, तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
