शिवसेना ठाकरे गटाची मलमपट्टी
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग-चौल रस्त्यावरील मुखरी गणपती मंदिरा समोरील रस्त्याच्या मधोमध भले मोठे भगडदाड पडल्याची घटना घडली. येथील रस्त्याची मोरी जिर्ण व कमकुवत झाल्याने हे भगदाड पडले असून, ते अवजड वाहनांसह छोट्या वाहनांच्या अपघातास निमत्रंण ठरत आहे. चौल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या युवासेनाने त्यावर सिमेंट काँक्रिटने पक्की मलमपट्टी करून रस्त्यावरील भगदाड बुंजवले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. परंतु, येथील रस्त्याची मोरी जिर्ण व कमकुवत झाल्याने तात्पुरती केलेली मलमपट्टी किती दिवस तग धरून बसेल, असा प्रश्न प्रवाशांसह स्थनिकांमधून उपस्थित केला जात आहे.
चौल-अलिबाग मुख्यः रस्त्यातील चौल मुखरी गणपती नजीकच्या रस्त्याच्या मधोमध भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे या ठिकाणाहून वाहतुक करताना वाहनचालकांसह प्रवासी वर्गाला मोठी समस्या निर्माण होत होती. यादरम्यान, चौल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने सिमेंट क्रॉकिटने रस्त्याला पडलेले भगदाड बुजविले व वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. परंतु, या रस्त्यातील मोरी जुनी व जिर्ण झाली असून या रस्ताला खोलगट उतरता आकार प्राप्त झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिकांमधून वर्तविली जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या रस्त्याच्या नुतनीकरणाकडे तसेच मोरी दुरूस्ती व नुतनीकरणास प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक, प्रवासी वर्ग व वाहन चालकांकडून केली जात आहे. दरम्यान, हे धोकादाय भगदाड चौल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने बुजविल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून धन्यवाद देण्यात येत आहे.







