। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमानुसार रायगड जिल्ह्यात निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सोडतीकडे राजकीय पक्ष तसेच इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पनवेल व उरण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवण्याच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखीव जागा निश्चित करुन आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचना सादर करण्यासाठी पनवेलमधील फडके नाट्यगृहात बुधवारी नागरिकांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर उरण विभागातील नागरिकांसाठी उरण पंचायत समिती कार्यलयात बुधवारीच 11 च्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पनवेलची सोडत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आराखड्यानुसार पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत. तर पंचायत समितीचे 18 गण आहेत. उरण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण आहेत.