वीजबिले मुदत संपल्यावर येतात हातात; अधिकारी सुस्त
| दिघी | वार्ताहर |
गेल्या काही महिन्यांंपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील ग्रामस्थांना वेळेत बिल न मिळाल्याने अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे वाढीव रिडींगचा प्रकार, याशिवाय बिल भरण्याची मुदत संपून गेल्यावर ते हातात मिळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. महावितरणचे अधिकारी मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या वतीने वीजबिल उशिरा दिले जात आहे. मुदत संपून दोन किंवा चार दिवस होऊन गेल्यावर बिल मिळत असल्याचे नेहमीचेच ठरले आहे. यावेळेला तर एक, दोन महिन्यांची बिले ग्राहकांना मिळालीच नाही. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडू लागली आहे. नागरीकांना वीज बिल वेळेत मिळावे यासाठी महावितरणने बिलदेण्याचे काम खाजगी एजन्सीला दिले आहे. बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या कमाल 15 दिवस व किमान आठ दिवस अगोदर बिल ग्राहकांच्या हातात मिळणे अपेक्षित असते. परंतु इतर विभागात वीज बिलाच वितरण उशिरा करण्यात आले आहे. अनेक नागरिकांना मिळालेल्या बिलाची भरणा करण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील बहुतेक गावात घरातील माणसे मोलमजूरी साठी घराबाहेर जात असल्याने कामाच्या व्यापात बिलभरण्यास वेळ लागतो. दोन दिवसात ते भरले नाही तर डीपीसी भरावा लागत आहे. याशिवाय पुढील वेळेला थकबाकीत नाव तर येणार नाहीना अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे. महावितरण आता बिल थकले की लगेच वीजपुरवठा खंडित करते. हा नेहमीचाच प्रकार असून ग्राहक हवालदिल झाले आहे.