गोगावले समर्थकांची दडपशाही; पोलीस प्रशासन अपयशी
| महाड | प्रतिनिधी |
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल, असे भाष्य दोन दिवसांपूर्वी केले होते. याबाबत ठिकठिकाणी राज्यात आ. भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता. त्याच पद्धतीने महाडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला.
महाड मधील छ. शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या वतीने दुपारी चारच्या सुमारास आ. भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. मात्र, तत्पूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच फळी उभी केली. जर ठाकरे गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू, असा पवित्रा शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांनी घेतला. महाराजांच्या स्मारकाला हार घालताना दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण देखील झाली. यामुळे चौकामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ही संपूर्ण परिस्थिती हाताळ्यासाठी पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर घडल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
महाडचे उपविभागीय पोलीस शंकर काळे यांनी पोलीस पथक सोबत असताना देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात विलंब केला. केवळ बघायची भूमिका घेतल्याने दोन्ही गटाकडून कार्यकर्ते जमा होऊन आक्रमक होत गेले. तसेच, ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जाणार होता, ही माहिती असतानादेखील पोलिसांनी चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमा कसे होऊन दिले? असा प्रश्न उद्धव गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. माणगाव उपविभागीय पोलीस स्वामी हे पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवण्यात यश मिळवले.
छ. शिवाजी महाराज चौकात सत्ताधारी शिंदे गट व विरोधी ठाकरे गट कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाद्वारे ग्रामीण भागात पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलिसांनी गावातील हालचालींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची चर्चा होत आहे.







