सीमाशुल्क विभागाचा कारवाईचा बडगा

| उरण | प्रतिनिधी |

देशातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जेएनपीए परिसरातील लॉजिस्टिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. द्रोणागिरी येथील डीआरटी-कॉन्कोर कंटेनर फ्रेट स्टेशन मधील गंभीर सुरक्षा त्रुटी आणि निर्यातीच्या मालाच्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत जवाहरलाल नेहरू सीमाशुल्क आयुक्तालयाने या सीएफएसची मान्यता तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे. या निर्णयामुळे आयात-निर्यात क्षेत्रात खळबळ उडाली असून, जेएनपीएच्या लॉजिस्टिक साखळीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, द्रोणागिरी रेल्वे-लिंक्ड डीआरटी-कॉन्कोर सीएफएस हे दरमहा सुमारे 14 हजार टीईयू कंटेनर हाताळणारे महत्त्वाचे केंद्र आहे. जेएनपीएमार्गे होणाऱ्या आयात-निर्यात व्यवहारात या सीएफएसची महत्त्वाची भूमिका आहे. सीमाशुल्क विभागाने यापूर्वी सीमाशुल्क क्षेत्रांमधील माल हाताळणीविषयक नियम अंतर्गत सर्व कंटेनर फ्रेट स्टेशन, आयसीडी आणि लॉजिस्टिक सेवा प्रदात्यांना सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या तसेच सीमाशुल्क नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे तपासात आढळले. विशेषतः डीआरटी-कॉन्कोर सीएफएसमध्ये सुरक्षेतील गंभीर त्रुटी कायम असल्याचे तसेच निर्यातीच्या मालाच्या चोरीच्या घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने कठोर भूमिका घेत 22 जुलै रोजी परवाना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. या आदेशानुसार, 22 जुलैपूर्वी सीएफएसमध्ये दाखल झालेल्या आयात व निर्यात मालाची आवश्यक सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण करून क्लिअरन्स अथवा विल्हेवाट लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तत्काळ प्रभावाने कोणताही नवीन आयात-निर्यात माल स्वीकारण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

Exit mobile version