जेएनपीटीवर सायबर हल्ला

कंटेनर टर्मिनलचे काम चार दिवस ठप्प
जहाजे समुद्रात लटकली, वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

। उरण । वार्ताहर ।

जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलवर सायबर हल्ला झाल्याने जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे कामकाज गेली चार दिवस विस्कळीत झाले आहे. एकंदरीत केंद्र सरकारच्या एकमेव मालकीच्या राहिलेल्या जेएनपीटी कंटेनर टर्मिनलवर सायबर हल्ला झाल्याने कंटेनरच्या हाताळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे परदेशातील जहाजे समुद्रातच लटकल्याने जेएनपीटी बंदराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नवी मुंबई , मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील जेएनपीटीने न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल, गेट वे टर्मिनल्स इंडिया, न्हावा शेवा इंटरनॅशनल गेट वे टर्मिनल आणि नव्याने सुरू करण्यात आलेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स आदी चार टर्मिनल्सचे या अगोदर खासगीकरण करण्यात आले आहे. जेएनपीटीच्या मालकीच्या उरलेल्या एकमेव कंटेनर टर्मिनलचेही खासगीकरण करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या नौकानयन खात्याने सुरू केली आहे. सरकारच्या एकमेव मालकीच्या उरलेल्या जेएनपीटीच्या याच टर्मिनलवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे जेएनपीटीद्वारे संचालित कंटेनर टर्मिनलवरील आयटी यंत्रणा विस्कळीत झाली आहे. हल्ला इतका गंभीर आहे, की सर्व स्वयंचलित ऑपरेशन्स ठप्प पडले आहे. संगणक बंद झाल्याने टर्मिनलवरील कर्मचार्‍यांना कागद आणि पेन घेऊन काम करण्याची वेळ आली आहे.
एकंदरीत, जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलवरील सायबर हल्ल्यामुळे जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलमधील अनेक जहाजे समुद्रातच लटकली आहेत. जेएनपीटीची स्वयंचलित यंत्रणा मागील चार दिवस ठप्प झाल्याने जेएनपीटी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका हा प्रवाशी वाहनांना बसत आहे.

करोडो रुपयांचे नुकसान
सध्या जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने आपल्या बंदरातील काम काज इतर खासगी बंदरातून सुरू केला आहे. सायबर हल्ल्यामुळे जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कामगार वर्ग करत आहेत.

Exit mobile version