सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहर पोलीस स्टेशन सायबर पथकाने सायबर गुन्ह्यात 5 लाख 14 हजार 500 रुपयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तक्रारदार संतोष अस्वले यांनी टाटा स्टीलची खरेदी करण्याकरिता गुगल वर नंबर शोधून आरोपी यास ऑर्डर देऊन त्यांना आरोपी याने खोटे इन्व्हाईस पाठवून त्यांची एकूण 5,14,500 इतके रुपयाची फसवणूक केली होती. नमूद गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून टाटा स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट या कंपनीचा नावाने मोबाईल क्रमांकमध्ये अपलोड केलेला आरोपी सूर्यांश सहज सिंह याचे लोकेशन सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे होते. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली पो उप निरी. अभय कदम, पोहवा थवई, पो.शि. गायकवाड, पो.शि. मेरया, पो.शि. पालवे, पो.ना. प्रवीण पाटील हे सायबर पथक सुलतानपूर, उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. पथक सुलतानपूर, उत्तर प्रदेश येथे पोहोचल्यावर नमूद आरोपी हा नैनीताल, उत्तराखंड येथे जात असल्याचे लोकेशनद्वारे समजले. तरी सायबर पथक तात्काळ रात्रीचा प्रवास करून सुलतानपूर ते नैनिताल असे 500 कि.मी. प्रवास करून भीमताल पोलीस ठाणे, नैनिताल येथे पोहोचले. नैनिताल येथील पोलीस अमलदार जितू ठाकूर यांच्या मदतीने आरोपी सूर्यांश सहज सिंह यास भिमताल पोलीस ठाणे हद्दीत आरोपी मिळून आल्याने त्याचा ताबा घेतला. त्याच्या ताब्यात मोबाईल डिव्हाईस व लॅपटॉप मिळून आला. सदर आरोपी हा गुगल ऍड्स व वेबसाईट तयार केल्याचे त्याच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये मिळून आले आहे. तसेच मुख्य आरोपी सोबत चॅट मिळून आले आहेत. सदर आरोपी विरोधात पुरेसे तांत्रिक पुरावे प्राप्त झाले असून त्यास अटक करून मा. न्यायालय, नैनिताल, उत्तराखंड यांच्यासमक्ष हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली. पुढील तपास पो उप निरी. अभय कदम, करीत आहेत.

Exit mobile version