विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे धडे

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

आजच्या काळात मोबाईलचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रौढांप्रमाणे आता शालेय विद्यार्थीसुद्धा यामध्ये कमी नाहीत. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनवधानाने अथवा इतर शोध घेताना मुलांकडून अनभिज्ञ अपराध होऊ शकतो. अशा घटना विद्यार्थ्यांकडून होऊ नये यासाठी अंशू फाऊंडेशनतर्फे नांदगाव हायस्कूल येथे सायबर क्राईमबाबत विशेष मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

यावेळी अंशू फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गुंड, संगणक तज्ज्ञ स्वाती घाग तसेच, योगेश पाटील, सागर राऊत, भरत चव्हाण, राहील घलटे, निशा बिरवाडकर, नियती ठमके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निलेश गुंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वेब प्रोफाईल, फेक अकाऊंट, हॅकिंग, ऑनलाईन जुगार, खोट्या अफवा, मॉर्फिंग म्हणजे फोटोमध्ये बदल घडवून आणणे, सायबर दहशतवाद आदीबाबत विस्तृत प्रमाणात माहिती दिली. त्याचप्रमाणे आपला पासवर्ड दुसर्‍या व्यक्तीला देऊ नये, अनोळखी व्यक्तीला फोटो देऊ नका किंवा त्याच्याशी चर्चासुद्धा करू नका. मोबाईल गरज असेल तरच वापर करावा.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर हेल्प लाईन नंबरसुद्धा देण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगली माहिती मिळाली असून, भविष्यात विद्यार्थी मोबाईलचा वापर अतिशय काळजीपूर्वक करून आपली वाटचाल यशस्वीरित्या करतील, असा विश्‍वास मुख्याध्यापिका अर्चना खोत यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version