। अलिबाग । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत सायकल प्रेमी व रक्षा सामाजिक विकास मंडळ या संस्थेतर्फे श्रीनगर ते लेह-लडाख अशी अतिउंचीवरील सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेद्वारे सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला.

रक्षा सामाजिक विकास मंडळ ही संस्था, गेली सहा वर्ष आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विविध क्षेत्रांमध्ये जनजागृती करीत आहे. या वर्षी श्रीनगर (जम्मू काश्मीर राज्य) ते लेह लडाख अशा अतिउंचीवरील प्रदेशात 445 किलोमीटर सायकल चालवून ही मोहीम पूर्ण केली. या मोहिमेत अतिउंचीवरील विरळ हवामानात 10 हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, असे जोझिला पास 11 हजार 557 फूट, नमीकला पास 12 हजार 139 फूट, फोटूला पास 13 हजार 479 फूट हे 3 पॉईंट्स पाऊस पडत असताना बोचर्या थंडीत व काही वेळेस रणरणत्या उन्हात 37 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पार केले. तर मोहिमेतील काही सदस्यांनी मोहिमेतील मार्गातील लामायुरू, खालसी व ससपोल या गावांतील शाळांमध्ये 250 विद्यार्थी व 30 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. यात ढगफुटी, भूकंप व बर्फाचा कडा कोसळणे, याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये स्वत:चा व इतरांचा जीव वाचविण्यासाठी सहाय्यकारी ठरणारे प्रशिक्षण देण्यात आले.
या सायकलस्वारांनी द्रास आणि कारगिल येथे असलेल्या कारगिल वॉर मेमोरियललाही भेट दिली व 1999 मध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना मानवंदना दिली. या मोहिमेत 7 सायकलस्वार सहभागी झाले होते व मदतनीस म्हणून तीन सदस्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. सायकलस्वार मोहिमेचे पथकप्रमुख प्रकाश पटवर्धन, श्रीराम फाटक, हितेन राणे, किशोर साळवी, अमित मोने, श्रीरंग जोशी व अमित गुरव सहभागी झाले होते, तर मदतनीस व छायाचित्रकार म्हणून विशाल गायकवाड, भावेश ठक्कर व गौरव फाटक यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली.
याचबरोबर लेह येथील जगातील सर्वात उंच रस्ता म्हणजेच खारदुंगला पास 18 हजार 380 फूट या ठिकाणी सायकल मोहिमेतील श्रीरंग जोशी व किशोर साळवी हे सायकलस्वार अतिशय खडतर वातावरणात येथे सायकलवर पोहोचण्यात यशस्वी झाले व त्यांनी तेथे भारतीय तिरंगा ध्वज फडकवला.