मंदोस चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळामध्ये झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. हे वादळ किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा देत 8 डिसेंबरला या वादळाचा फटका तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्रप्रदेशला बसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मंदौस असं या चक्रीवादळाचे नाव आहे.

सदर वादळाच्या पाश्‍वर्र्भूमीवर विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, कांचीपुरम, तिरुवल्लूर, अरियालुर, पेराम्बलुर, चेन्नई, कल्लाकुरिची, माइलादुथुराई, तंजावुर, तिरुवरुर आणि नागापट्टिनम या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये काळजी घेण्याची जास्त गरज असल्याचं दिसत आहे, कारण 2016 नंतर इथं पूरसदृश्य परिस्थिती उदभवू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागर आणि नजीकच्या संपूर्ण परिसरात गेल्या काही काळापासून वातावरण सातत्यानं बदलत आहेच. ज्यामुळं डिसेंबर महिन्यामध्येही देशाच्या काही भागांमध्ये वरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. फक्त दक्षिण किनारपट्टीच नव्हे, तर तिथे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातही सोसाट्याचा वारा सुटेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

विदर्भातही पावसाचा अंदाज
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने यासंबंधीची माहिती दिली. तिथे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किमी अंतराच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दि.11 डिसेंबरला होणार आहे. यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याच दिवशी मेट्रोच्या रिच 2 आणि 4 चा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. पण, आता मात्र या दोन्ही बहुप्रतिक्षित कार्यक्रमांवर पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत.

Exit mobile version