कळंबोलीत सिलेंडरचा स्फोट

आजूबाजूच्या घरांचे नुकसान

। कळंबोली । वार्ताहर ।

पनवेल ग्रामीण (वा) पालिका हद्दीतील कळंबोली गावातील एका रहिवाशी संस्थेतील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 20) घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.

माहितीनुसार, गणेश सृष्टी रहिवाशी संस्थेतील 6 मजल्यावर असलेल्या सी 601 क्रमांकाच्या घरात घरगुती वापराच्या गॅसचे तीन सिलेंडर ठेवण्यात आले होते. या पैकी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून, सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला एक किलोमीटर अंतरापर्यत ऐकू गेला आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे गणेश सृष्टी इमारतीतील या घराची बाहेरील भिंत पूर्ण पणे तुटली असून, तुटलेल्या भिंतीचे तुकडे आजूबाजूला उडून इमारती शेजारील घरांचे यामुळे नुकसान झाले आहे. तसेच स्फोटात फुटलेल्या सिलेंडरचे तुकडेदेखील इमारती खाली विखूरले आहेत. महत्वाचे म्हणजे बंद असलेल्या या खोलीत झालेला हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत माहिती मिळाली नसून, घटनेनंतर घटनास्थळी पोहचलेले अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी स्फोट कशामुळे घडला याचा तपास करत आहेत.

Exit mobile version