| पनवेल | वार्ताहर |
तळोजा येथील बी. जी. शिर्के कामगार वसाहतीमध्ये महाशिवरात्री दिनी बुधवारी (दि.26) सकाळी सिलेंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत कामगारांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच कळंबोली येथील अग्निशमन दल जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
तळोजा फेज-2 मध्ये सिडको गृहनिर्माण प्रकल्पाचे काम शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरु आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या निवासासाठी लोखंडी पत्र्यांची घरे उभारण्यात आली आहेत. या ठिकणी सकाळच्या सुमारास झालेल्या सिलेंडर गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत पंधरापेक्षा अधिक घरे जळून खाक झाली. या आगीत कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीमुळे परिसरात मोठया प्रमाणात धूर पसरला होता. आगीत बहुतांश घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दल जवानांनी वेळीच तीन सिलेंडर बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. तळोजा येथील बी. जी. शिर्के कामगार वसाहतीमध्ये गॅस सिलेंडर मधून झालेल्या गळतीमुळे आगीची घटना घडल्याचे दिसून येते. या आगीत कामगारांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे कळंबोली अग्निशमन केंद्राचे अधिकारी फतेसिंग गायकवाड यांनी सांगितले.