। पुणे । प्रतिनिधी ।
चऱ्होली परिसरातील प्राइड वर्ल्ड सिटी या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आठ नागरिकांना चाकूचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा तीनने दोघांना अटक केली आहे.
विश्वजीत अर्जुन पवार आणि यव्हान भास्कर कासार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी आळंदी, पुणे शहरात आणि ग्रामीण भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे तसेच, त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्याची घटना घडली होती. दोन दिवसांमध्ये एकूण 14 घटना घडल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच, याबाबत दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्यात सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट तीनचे अधिकारी आणि खंडणी विरोधी पथक त्याचबरोबर आळंदी आणि दिघी पोलीस ठाणे हे समांतर तपास करत होते. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी यव्हान भास्कर कासार आणि विश्वजीत अर्जुन पवार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.