राऊतांचा महायुती सरकारला सवाल
। मुंबई । प्रतिनिधी ।
पुण्यात मोकाट सुटलेल्या गँग्सना कायद्याची भीती राहिलेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना आयुक्तांचे अभय आहे. महिलांवर खुलेआम अत्याचार, बलात्कार होत आहेत आणि गृहखाते राजकीय कार्यासाठी वापरले जात आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर होत असून लाडक्या बहिणींना सुरक्षा कधी देणार? असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला आहे. गुरुवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
स्वारगेट बस डेपामध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेवरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील स्वारगेट भागात शिवशाही बसमध्ये घृणास्पद, किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारा प्रकार घडला. लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये दिले म्हणजे तुम्ही तिची अब्रु विकत घेतली का? तसेच, महिन्याला 1500 दिले म्हणून गुंडांना, विकृतांना बहिणींचे वस्त्रहरण करण्याचे लायसन्स दिले का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.