। मुंबई । प्रतिनिधी ।
ॲन्टॉप हिल परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबत दारू प्यायला आला नाही म्हणून मित्रानेच मित्रावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात आफताब वझीर शेख (21) गंभीर जखमी झाला असून त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, हल्ला करणारा आरोपी शाहिद रियाज अन्सारी (22) याला पोलिसांनी अटक केली आहे.
ॲन्टॉपहिल परिसरात बुधवारी (दि. 26) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रारदार शेख ॲन्टॉप हिल येथील महाराष्ट्र नगर परिसरातील रहिवासी आहे. तर आरोपी अन्सारी हा ॲन्टॉप हिल परिसरातील विक्रांत सोसायटीमध्ये राहतो. दोघेही चांगले मित्र असून दोघेही बुधवारी रात्री ए. ए. इंटरप्रायजेससमोर पानाच्या दुकानाजवळ भेटले. ओमी पंजाब बारमध्ये आपल्यासोबत दारू पिण्यासाठी का आला नाही, अशी विचारणा अन्सारीने तक्रारदार शेखकडे केली. शेखने सुरूवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अन्सारी संतापला आणि त्याने शेखला शिवीगाळ करत शेखवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्याची पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी शाहिद रियाज अन्सारी याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.