| नवी मुंबई | प्रतिनिधी |
खोपोली नजिकच्या वॉटर पार्कला नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक 76ची पिकनिक गेली होती. वॉटर पार्कला जायचे म्हणून आठवीत शिकणारा आयुष सिंगही आनंदात होता. पिकनिकला जायची सगळी तयारी त्याने आदल्या रात्री करुन ठेवली. सकाळी लवकर उठला. मित्रांसोबत सहलीला जायचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
आयुषने वॉटर पार्कमधील राईडवरुन धम्माल केली. संध्याकाळपर्यंत सगळं काही छान चाललं होतं. मात्र साडेपाचच्या सुमारास अचानक आयुषला त्रास झाला. त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला. अचानक आयुषला काय झालं म्हणून अवतीभोवती मित्रांनीही गर्दी केली. तातडीने आयुषला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषला मृत घोषित केले. 13 वर्षीय आयुष सिंग याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. वॉटर पार्कमध्ये इतर मुलांसोबत राईड खेळून झाल्यानंतर हा मुलगा थकला होता, त्यानंतर त्याला अचानक उलट्या सुरू झाल्या. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, पण वाटेमध्येच मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती पण आयुषचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सरकारचे नियम डावलून महापालिकेच्या शाळेने पिकनिक अडवेंचर पार्कला का नेली? 2017 मधील शासकीय आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सहली वॉटरपार्कला नेण्यावर निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे शाळेला वॉटर पार्कला सहल नेण्याची परवानगी कुणी दिली? आयुषच्या मृत्यूला एकप्रकारे शाळा प्रशासनचं जबाबदार असल्याचा आरोप संतप्त पालकांकडून केला जातोय. शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून मुलांच्या जीवाशी खेळ कोण करतंय? मुळात शाळेनं विद्यार्थ्याची काळजी का घेतली नाही असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.