लाल मैदानावर रंगणार महामुकाबला; रेल्वे संघांची अंतिम फेरीत धडक
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्पोर्ट्स क्लब तर्फे पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा परळच्या ऐतिहासिक लाल मैदानावर सुरू आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले होते. चुरशीच्या लढती, दमदार संरक्षण, अचूक रणनीती आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला थरार यामुळे लाल मैदानावरील वातावरण भारावून गेले होते. अखेर सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पहिल्या उपांत्य फेरीत सेंट्रल रेल्वेने रचना नोटरी वर्क्सचा 11-10 (मध्यंतर 10-6) असा 7.50 मि. राखून थरारक पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सेंट्रल रेल्वेने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. विजयी संघाकडून शुभम थोरात, अवधूत पाटील, रामजी कश्यप, निखिल बी. आणि मिलिंद चावरेकर यांनी शानदार खेळ करत संघाचा विजय निश्चित केला. तर, पराभूत रचना नोटरी वर्क्सकडून प्रथमेश दुर्गावले, सदाशिव पालव, ओमकार मिरगळ, रुपेश कोंढाळकर आणि यश बोरकर यांनी कडवी झुंज दिली; मात्र, अंतिम फेरीचे स्वप्न अधुरेच राहिले.
दुसऱ्या उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेने महाराष्ट्र पोस्टचा 8-9 (मध्यंतर 4-9) असा 1 डाव राखून 1 गुणाने धुव्वा उडवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेस्टर्न रेल्वेने अचूक डावपेच आणि मजबूत संरक्षणाच्या जोरावर सामन्यावर वर्चस्व राखले. विजयी संघाकडून राहुल मंडल, महेश शिंदे, अभय रत्नाकर, वृषभ वाघ, आदित्य गणपुले, निखिल सोडिये आणि विजय शिंदे यांनी अप्रतिम खेळाची झलक दाखवत संघाला विजय मिळवून दिला. तर, पराभूत महाराष्ट्र पोस्टकडून तांबे, धीरज भावे, प्रतीक देव्हारे, आकाश साळवे आणि शुभम शिंदे यांनी आटोकाट प्रयत्न केले; मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही.
रेल्वे विरूद्ध रेल्वेत संघर्ष
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांच्यात विजेतेपदासाठी जबरदस्त संघर्ष रंगणार असून, परळच्या लाल मैदानावर पुन्हा एकदा वेग, चपळाई आणि रणनीतीचा अद्भूत संगम पाहायला मिळणार आहे. खो-खो प्रेमींमध्ये अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धा 2026'चा किताब कोण पटकावणार? याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.






