| ठाणे | प्रतिनिधी |
बदलापूरमध्ये नाश्त्याच्या हातगाडीवर असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात इमारतीमधील वॉचमन जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
बदलापूरच्या मांजर्ली परिसरातील एका बंद असलेल्या स्नॅक्सच्या हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परिसरातील जमा केलेला कचरा जाळल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला होता. इतकेच नाही तर आजूबाजूच्या इमारतीतील घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तसेच इमारतीचा वॉचमन जखमी झाला आहे. स्फोट झाला ती हात गाडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. सकाळी दहा वाजताच्या सुमारास बाजूच्या इमारतीतील वॉचमन हा हात गाडीच्या बाजूला परिसरातील कचरा जाळत होता. यावेळी आगीचा सिलेंडरशी संपर्क झाला आणि त्यामुळे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. गेल्या तीन ते चार महिन्यापासून ही हात गाडी बंद होती. सकाळी थंडी जाणवत असल्याने आणि परिसरात कचरा जमा झाल्याने तो पेटविण्यासाठी वॉचमन गेला होता. मात्र या हात गाडीमध्ये एक सिलेंडर होता. याबाबत वॉचमनला कल्पना नव्हती. कचरा पेटविल्याने अचानक भडका उडून स्फोट झाला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
बदलापूरमध्ये सिलिंडरचा स्फोट; एकजण जखमी
