शूटिंग रेंजमध्ये सिलिंडरचा स्फोट

नेमबाजाने गमावला डावा अंगठा


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |


राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंदरकुमार याच्या डाव्या अंगठ्यावर आघात झाला. नवी दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना स्फोट झाला आणि त्यामध्ये पुष्पेंदरकुमारवर डावा अंगठा गमावण्याची आपत्ती ओढवली. आता त्याला भारतीय सैन दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पेंदर इंडियन एअर फोर्स (आयएएफ) टीमचा वरिष्ठ अधिकारी आहे.

पुष्पेंदर राष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी दिल्लीतील शूटिंग रेंजवर सराव करीत होता. आपल्या पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना ही घटना घडली. एका राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, पुष्पेंदरच्या आईचे 15 ते 20 दिवसांपूर्वी निधन झाले होते. पुष्पेंदर हा उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील नेमबाज आहे. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्येच तो सराव करतो. या घटनेनंतर आता राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये त्याला सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, एका प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले की, पुष्पेंदर हा अव्वल दर्जाचा नेमबाज आहे. तो 28 ते 30 वर्षांचा असून, त्याच्या शरीरावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. पिस्तूलमधील सिलिंडरमध्ये कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्याबाबत आपल्याला सूचना मिळते. जास्त प्रमाणात गॅस भरल्यासही स्फोट घडून येतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रक्रिया अशाप्रकारे होते
एअर पिस्तूल व एअर रायफल यांच्या बॅरेलच्या खाली छोटा गॅस सिलिंडर असतो. जेव्हा नेमबाज ट्रिगर दाबतो, तेव्हा सिलिंडरची गॅस एअर गनच्या आतमध्ये हातोड्याप्रमाणे टक्कर देते. त्यामुळे गोळी बाहेर पडते. एअर पिस्तूलमध्ये एका निश्चित शॉटच्या संख्येनंतर कॉम्प्रेसर किंवा पोर्टेबलच्या साह्याने सिलिंडर भरावा लागतो.

Exit mobile version