18 व्या वर्षी ठरला बुद्धिबळाचा जगज्जेता
। सिंगापूर । वृत्तसंस्था ।
बुद्धिबळ म्हटले की विश्वनाथ आनंद हेच नाव पिढ्यान पिढ्या ऐकू येत होते. पण आता या क्षेत्रात नव्या नावाचे पदार्पण झाले आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश हा विश्वविजेता ठरला आहे. त्याने 18व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला आहे. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचे आव्हान मोडून काढत त्याने हा इतिहास घडवला आहे. विश्वविजेत्याला पराभूत करत भारताचा युवा स्टार जगज्जेता बनला आहे. 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेशने जागतिक अजिंक्यपद 2024 स्पर्धेत चिनच्या डींग लिरेनला शेवटच्या डावात पराभूत करत सर्वात युवा विश्वविजेता बनण्याचा मान पटकावला आहे.
तेराव्या डावापर्यंत हा सामना बरोबरीत चालला होता. तत्पुर्वी 11 व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली होती. 12व्या डावात लिरेनने बाजी मारली होती. यामुळे अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार, याकडे बुद्धिबळ चाहत्यांचे लक्ष लागले होते. पण 14 व्या डावात डी गुकशेसमोर लिरेनला पराभूत करून विश्वविजेता बनण्याचे आवाहन होते. गुकशेने आवाहन स्वीकारले आणि 7.5 -6.5 अशा फरकाने सामना जिंकला. 2018 साली सलग 108 दिवस न हरता खेळण्याचा पराक्रम लिरेनने केला होता. अशा खेळाडूला पराभूत करत गुकेशने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डिंग लिरेनने एक चूक केली. तीच संधी साधत डी. गुकेश याने हे विश्वविजेतेपद पटकावले आहे. शेवटचा सामना पाच तास चालला. आणि यावेळी लिरेनकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याला डाव, सामना आणि जगज्जेतेपद असे सारेच गमवावे लागले. गुकेशच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्याचे अभिनंदन केले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कँडिडेट्स स्पर्धा जिंकून गुकेशने जागतिक मुकुटासाठी सर्वात तरुण स्पर्धक म्हणून सामन्यात प्रवेश केला होता. तो जागतिक विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला आहे. भारतीय दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी 5 वेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावला आहे. विजतेपदानंतर डी गुकेशने 13 लाख डॉलर्सची कमाई केली आहे. तर, डिंग लिरेन 12 लाख डॉलर्सचा मानकरी ठरला आहे. त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे अठरावा विश्वविजेता म्हणून भारताच्या डी गुकेशचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.