| उत्तर प्रदेश | वृत्तसंस्था |
17 वर्षांच्या मुलाने स्वत:च्या आईची हत्या करत तिचा मृतदेह सहा दिवस लपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरती वर्मा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी मुलगा आईबरोबर गोरखपूरमध्ये राहत होता. तर त्याचे वडील नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहतात. सहा दिवसांपूर्वी आरोपी मुलाच्या आईने सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी त्याला झोपेतून उठवले होते. त्यावेळी चिडलेल्या मुलाने तिला जोरदार धक्का दिला. त्यामुळे ती भिंतीवर जाऊन धडकली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि रक्तस्त्राव होऊ लागला. मुलाने तिला रुग्णालयात न नेता तो महाविद्यालयात निघून गेला. ज्यावेळी तो महाविद्यालयातून परत आला, तेव्हा त्याला आईचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने कुणाला काहीही सांगितले नाही. तसेच महिलेचा मृतदेह एका खोलीत लपून ठेवला.
सहा दिवसांपासून पत्नीशी बोलणं होत नसल्याने मुलाचे वडील घरी आले. त्यावेळी त्यांना घरात पत्नीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण ज्यावेळी त्यांच्या हातात श्ववविच्छेदन अहवाल आला, तेव्हा महिलेचा मृत्यू सहा दिवसांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाची कसून चौकशी केली, त्यावेळी त्याने गुन्हा कबूल करत घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.