। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत आणखी एक यशस्वी कारवाई केली असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 178 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तसेच एक दुचाकी असा एकूण 2 लाख 71 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल न्यायालयाच्या पाठीमागील खाडीलगत परिसरात ही कारवाई करण्यात आली. पनवेल येथील आरोपी नायाब उर्फ बल्लू याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने एमडी ड्रग्ज बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पठाण, हेड कॉन्स्टेबल तुषार बोरसे, पोलीस नाईक अनिल चव्हाण, पोलीस नाईक सम्राट डाकी, पोलीस शिपाई मोकल आणि पोलीस शिपाई गोडे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. शोधमोहिमे दरम्यान आरोपीकडून 178 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज त्याची किंमत 57,600 रुपये आणि 2.14 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची रिक्षा जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2,71,600 रुपये इतकी आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.







